‘बौद्धिक संपत्ती अधिक मौल्यवान ‘ – डॉ. भरत सूर्यवंशी
पुणे:
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची ट्रेनिंग अँड लर्निंग अकादमी (अटल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बौद्धिक संपदा हक्क: संशोधनाचे संरक्षण आणि व्यापारीकरण’ या विषयावर एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम(शिक्षक विकास कार्यक्रम ) आयोजित करण्यात आला. भारत सरकारच्या पेटंट विभागाचे सहायक नियंत्रक डॉ.भरत सूर्यवंशी यांनी उद्घाटन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्य आणि समन्वयक डॉ. सुनीता जाधव, डॉ.सचिन चव्हाण, सह-समन्वयक प्रा. सोनाली माळी, डॉ. प्रियांका पायगुडे उपस्थित होते. भारतभरातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील ७० हून अधिक व्यक्तींनी नोंदणी केली होती. त्यात वकील आणि यशस्वी उद्योजकांनी व्यावहारिक अनुभव व दृष्टिकोन मांडले. उद्घाटन समारंभाचे संचालन डॉ. प्रियांका पायगुडे यांनी केले, तर प्रा.सोनाली माळी यांनी आभार प्रदर्शन केले.
डॉ.भरत सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की,’बौद्धिक संपत्ती ही महत्त्वाची मालमत्ता आहे कारण ती सर्जनशीलता, संकल्पना आणि नवकल्पनांना कायदेशीर संरक्षण प्रदान करते. यामुळे संशोधन व नवसंशोधनाचे अनधिकृत वापरापासून संरक्षण होते तसेच उत्पन्न निर्मिती, ब्रँड मूल्य आणि बाजारातील स्पर्धात्मकता वाढते. पेटंट आणि बौद्धिक संपदा हक्कांच्या व्यापारीकरणावर भर दिला पाहिजे.संशोधक व उद्योजकांनी आपल्या नवकल्पनांचा योग्य प्रकारे उपयोग करून आर्थिक वाढ आणि गुंतवणूक आकर्षित करावी. भारतातील तंत्रज्ञान व स्टार्टअप इकोसिस्टमच्या वाढीसाठी बौद्धिक संपदा हक्क व पेटंटची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे.विद्यापीठांमध्ये बौद्धिक संपदा हक्क व पेटंटची जाणीव वाढवणे आवश्यक आहे. यामुळे संशोधनाचे व्यापारीकरण होऊन नाविन्यपूर्ण संशोधनास चालना मिळते तसेच शैक्षणिक योगदानाला मान्यता आणि संरक्षण मिळते’.
प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद यांनी संस्थेच्या विविध रँकिंग, पुरस्कार व यशस्वी उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी महाविद्यालयाच्या नाविन्यपूर्ण संशोधन आणि स्टार्टअप क्षेत्रातील यशस्वी वाटचालीवरही प्रकाश टाकला.डॉ. सुनीता जाधव यांनीप्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, या उपक्रमामुळे सहभागी सदस्यांना बौद्धिक संपदा हक्क व्यवस्थापन, पेटंट मसुदा तयार करणे, ट्रेडमार्क संरक्षण आणि व्यापारीकरण यासंबंधी व्यावहारिक कौशल्ये व ज्ञान मिळेल.
………………………………………………