केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचे
शुक्रवारी (दि. ३१) राष्ट्रीय परिषदेला संबोधन
- एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पुणे: दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आणि ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम ऑडिटोरियम, एनडीए रोड, पाषाण, पुणे येथे ही परिषद होत आहे. ‘विकसित भारतासाठी एरोस्पेस क्षेत्रातील आव्हाने’ या संकल्पनेवर ही राष्ट्रीय परिषद होत आहे.
परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता ‘इसरो’चे माजी चेअरमन डॉ. एस. सोमनाथ, डीआरडीओ’चे माजी चेअरमन व सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, महासंचालक प्रा. प्रतीक किशोर, ‘डीआरडीओ’ ‘एचईएमआरएल’चे संचालक डॉ. ए. पी. दास, ‘एआरडीई’चे संचालक अंकाती राजू, सहयोगी संचालक एम. व्ही. रमेश कुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दुपारी ४ वाजता केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पिंजारापु राममोहन नायडू यांचे राष्ट्रीय परिषदेला संबोधन असणार आहे. यावेळी संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन डॉ. तय्यब कमाली हे या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘इसरो’चे चेअरमन डॉ. एस. सोमनाथ, डीआरडीओ’चे चेअरमन डॉ. सतीश रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हवाई क्षेत्राशी संबंधित नागरी हवाई उड्डाण, स्पेस व्हेइकल्स, सॅटेलाईट्स, एरो इंजिन्स, मिसाईल सिस्टिम्स, लढाऊ विमाने व एरोस्पेस, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स अशा विविध विषयांवर होणाऱ्या चर्चासत्रात तज्ज्ञ, शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. स्टार्टअप आणि उद्योग यांच्यातील संवाद सत्राचे, विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे प्रदर्शन, तसेच विविध स्मृती व्याख्याने या परिषदेत होणार आहेत.