जगद्गुरु संत तुकाराम महाराज्यांच्या पगडीची वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअसमध्ये नोंद
संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीची विश्वविक्रमात नोंद
देहू:संत तुकाराम महाराज बीजच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट – श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांना वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस फाऊंडेशनचे सी.ई.ओ पवनकुमार सोलंकी यांनी विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रसंगी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचा संपूर्ण परिवार तसेच मुकुंदनाना राऊत (महाराज), शंकर मराठे(महाराज), रविंद्र ढोरे (महाराज), नितिन काकडे (महाराज) उपस्थित होते. त्याच बरोबर आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
दिलीप सोनिगरा म्हणाले की जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन झालेल्या नगरीमध्ये आम्ही वास्तव करत असून याच परिसरात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायात स्थिर झालो आहे. तुकाराम महाराजांवर आमची नितांत श्रद्धा, प्रेम आणि स्नेह आहे. याच सदभावनेतून आम्ही जगातील सर्वात मोठी पगडी तयार केली असून वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस बुकमध्ये हिची नोंद झाली. सदरील पगडीचा घेराव हा २२ फुटांचा असून पगडीची उंची ४ फूट आहे. तर पगडीला ५०० मीटर लांबीचा कपडा लागला आहे.
मोरे म्हणाले की जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची दिलीप सोनिगरा यांनी दिलेली पगडी रुपी भेट अनमोल आहे. तुकाराम महाराज यांचे कार्य जगभरात असून जगातील सर्वात मोठी पगडी तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू येथे विराजमान झाली. सदरील पगडी ही प्रसिद्ध कारागीर शैलेश यादव यांनी तयार केली असून ही बनवण्यासाठी व पूर्व तयारीसाठी २ महिने लागले आहेत. सदरील पगडी दर्शनासाठी व पाहण्यासाठी सर्व भक्तांसाठी खुली आहे.
संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या देहू नगरीत आजचा सोन्याचा दिवस असून नभातून अमृता वर्षाव होत आहे. अशा भावना संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी व्यक्त केल्या. “तुका आकाशा” एवढा तेवढीच त्यांना शोभेल अशी पगडी दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी भेट दिली आहे. अशी ही अनमोल भेट संपूर्ण वारकरी संप्रदाय कायमस्वरूपी लक्षात ठेवेल.