श्री शिवभारत परिवाराकडून डोंगरगावात वीरगळ संवर्धन ; मातीत गाडलेल्या १३ वीरगळींचे केले संवर्धन
मुळशी:श्री शिवभारत परिवारातील सदस्यांनी डोंगरगाव मधील भैरवनाथ मंदिर परिसरात मातीच्या ढिगाऱ्या खाली गाडल्या गेलेल्या १३ वीरगळ बाहेर काढून त्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले आहे. ७ रविवारी काम करत हे वीरगळ संवर्धन काम पूर्ण करण्यात आले. सात रविवार चाललेल्या मोहिमेत १३ स्मृती शिळांना त्यांचे मूळ अस्तित्व प्राप्त करून देण्यात आले. यात ७ मोठ्या तर ६ मध्यम स्वरूपाच्या शिळा होत्या.स्मृतीशिळा आणि वीरगळी यांची माहिती देणारे फलक देखील बसविण्यात आले आहेत.
वीरगळ म्हणजे,
जो वीर गावासाठी देशासाठी वीरगतीस प्राप्त झाला असेल त्याच्या स्मरणार्थ ह्या वीरगळींची स्थापना करून गावाच्या वेशीवर, मंदिरांसमोर, किंवा शेताच्या बांधावर ठेवले जात. पूर्वीच्या काळी आक्रमण करणाऱ्या पातशाह्यांपासून बचावाच्या हेतूने बहुतेक लोकसंख्या ही डोंगराच्या पायथ्याशी जिथे पाण्याचा साठा मुबलक असेल तिथे राहत. तिथे देवाची स्थापना करून गाव वसवत आणि जेव्हा गावावर संपत्तीसाठी, लुटीसाठी किंवा गोधनासाठी युद्धे होत त्यात जो वीर गावाच्या रक्षणासाठी लढा देत असताना वीरगतीस प्राप्त होतो तेव्हा त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ अशा स्मारकांची स्थापना केली जात असत.या कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थांना वीरगळ आणि स्मृती शिळे काय त्याचे प्रकार कोणकोणते याबद्दल माहिती देण्यात आली. विरगळ संवर्धन कार्यक्रमात भाऊसाहेब क्षिरसागर गोविंद बोडके रामदास पडवळ शिदु शेजवळ शंकर शेजवळ ज्ञानेश्वर भांगरे पांडुरंग भांगरे गोविंद शेजवळ रामभाऊ शेजवळ दामू शेजवळ साधु शेजवळ,महादू शेजवळ, लक्ष्मण आखाडे या स्थानिकांनी देखील मदत केली.