पुणे : भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. तसेच माघ शुद्ध चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी करण्यात येते. हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये उत्साहाने साजरे करण्यात येतात. परंतु, या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक आहे. या संदर्भात विष्णुपुराण आणि गणेश पुराणात कथा सांगितलेली आहे. गणेश पुराण हे गाणपत्य सांप्रदायातील महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांना, व्यासांनी भृगू ऋषीला आणि भृगू ऋषींनी सोमकांत राजाला सांगितली.
उपासनाखंड आणि क्रीडाखंड असे या पुराणाचे दोन विभाग आहेत. गणेश पुराणामध्ये गणपतीसंदर्भातील अनेक कथा सांगितलेल्या आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे मुख्यतः एक व्रत आहे. काहीजण या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानतात. परंतु, गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला नाही. या चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हणतात.