मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात सर्वोतोपरी मदत करणार
खासदार नीलेश लंके यांची ग्वाही
दिल्ली : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत,दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.या संमेलनाच्या आयोजनात सर्वोतोपरी मदत केली जाईल.संयोजकांच्या वतीने देण्यात येणारी जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली जाईल अशी ग्वाही अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी दिली असल्याची माहिती संमेलनाचे सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी दिली.सरहद (पुणे ) या संस्थेच्या वतीने ९८ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.खासदार लंके यांनी संमेलनाच्या स्वयंसेवकांना आपल्या दिल्ली येथील निवासस्थानी बोलावून घेतले.
संमेलनाच्या आयोजनाची बारकाईने माहिती घेतली.या ऐतिहासिक संमेलनाच्या आयोजनात सहभागी होण्याची संधी मिळत आहे ही आपणासाठी अभिमानाची बाब आहे.आयोजकांच्या वतीने सोपवण्यात येणारी जबाबदारी पार पाडण्यात आपणास आनंद होईल.महाराष्ट्रातील शक्य तितक्या साहित्य रसिकांची आणि पत्रकारांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले असल्याचे जवळगे म्हणाले.
प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे.मराठी साहित्याच्या विकासासाठी झटणाऱ्या सर्वांना मदत करणे, त्यासाठी पुढाकार घेणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.देशाच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे.संमेलनाच्या आयोजकांना मदत करण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही.खासदार नीलेश लंके यांनी सांगितलं