डॉ. अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून निवड

माकपच्या २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशन

मुंबई:, राज्यातील मराठवाडा भागातील परभणी जिल्ह्यात सेलू येथे सीपीआय(एम)च्या २४व्या महाराष्ट्र राज्य पक्ष अधिवेशनाची यशस्वीरित्या सांगता झाली. या अधिवेशनात ४७ वर्षीय डॉ. अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमताने निवड करण्यात आली. ते कदाचित देशातील सर्वात तरुण पक्ष राज्य सचिव आहेत.

पॉलिट ब्युरो सदस्य आणि पक्षाचे समन्वयक प्रकाश कारत, पोलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू आणि डॉ. अशोक ढवळे या अधिवेशनास उपस्थित होते. राज्यातील २९ जिल्ह्यांतील एकूण ३३७ प्रतिनिधींनी या अधिवेशनात सहभाग घेतला, ज्यामध्ये ६३ महिला (जवळजवळ १९ टक्के) होत्या.

२४व्या राज्य अधिवेशनाची सुरुवात ८०-८२ वयोगटातील ज्येष्ठ नेते नरसय्या आडम, उदयन शर्मा, दत्ता माने आणि शिवगोंडा खोत यांनी ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात केली. त्यानंतर शहीदांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. सोलापूर येथील प्रजा नाट्य मंडळाच्या कला मंडळाने क्रांतिकारी गीते सादर केली.

आपल्या संक्षिप्त प्रस्तावनेत, सीपीआय(एम)चे परभणी जिल्हा सचिव उद्धव पौळ आणि स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. यू. आर. थोंबाळ यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी त्यांनी गौरवशाली स्वातंत्र्यलढ्याचा आणि निजामाविरुद्धच्या हैदराबाद मुक्ती संग्रामाचा गौरवशाली वारसा मांडला.

प्रकाश कारत यांनी अत्यंत उद्बोधक उद्घाटन भाषण दिले. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिउजव्या साम्राज्यवादी शक्तींचा उदय, जगावर आणि भारतावर त्याचा प्रभाव, पॅलेस्टाईनविरुद्धचे नरसंहारक युद्ध, जागतिक स्तरावर उजव्या विचारसरणीच्या शक्तींचे एकत्रीकरण या विषयांचे विश्लेषण केले. त्याच वेळी त्यांनी लॅटिन अमेरिकेतील विविध देशांमध्ये आणि श्रीलंकेत डाव्या विचारसरणीच्या शक्तींनी केलेल्या प्रतिकारावर व त्यांनी नोंदवलेल्या विजयांवरही महत्त्वाचे भाष्य केले.

प्रकाश कारत यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील आरएसएस-भाजप राजवटीच्या नव-फॅसिस्ट, सांप्रदायिक, मनुवादी आणि कॉर्पोरेट समर्थक स्वरूपावर हल्ला चढवला. त्यांनी देशात सीपीआय(एम) ने चालवलेल्या संघर्षांचा उल्लेख केला आणि त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे आवाहन केले. शेवटी, त्यांनी सीपीआय(एम) आणि डाव्या शक्तींना त्यांचे सामर्थ्य अनेक पटीने वाढवण्याचे तसेच आरएसएस-भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट भक्कम करण्याचे आवाहन केले. राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने सत्राचा समारोप झाला.

प्रतिनिधी सत्रात, राजकीय-संघटनात्मक अहवाल राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी सादर केला. अहवालाचे चार छापील भाग सर्व प्रतिनिधींना वाटण्यात आले. या चर्चेत ५९ प्रतिनिधींनी भाग घेतला, त्यापैकी १५ (२५ टक्के) महिला होत्या. राज्य सचिवांच्या उत्तरानंतर, अहवाल काही दुरुस्त्यांसह एकमताने मंजूर झाला. सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर आठ ठराव सादर करण्यात आले, जे एकमताने मंजूर झाले.

शेवटच्या दिवशी पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू यांनी अधिवेशनाला संबोधित केले. क्रेडेन्शियल कमिटीचा रिपोर्ट अजय बुरांडे यांनी मांडला. त्यात अनेक वैशिष्ट्ये होती, उदाहरणार्थ, ५० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधी ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.

पहिल्या दिवशी संध्याकाळी, हजारो श्रमिक लोकांची एक भव्य आणि प्रभावी रॅली सेलू शहरात निघाली. एका मोठ्या जाहीर सभेने तिचा समारोप झाला. प्रकाश कारत, डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, नरसय्या आडम, जे. पी. गावीत, मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड,आमदार विनोद निकोले आणि इतर नेत्यांनी या सभेला संबोधित केले.

दुसऱ्या दिवशी, डाव्या पक्षांचे नेते – शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे प्रा. राम बाहेती, सीपीआय (एमएल-एल) चे अजित पाटील, लाल निशाण पक्षाचे भीमराव बनसोड आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले यांनी अधिवेशनाला सदिच्छा दिल्या.

या अधिवेशनात ५० सदस्यांची नवीन राज्य समिती, ज्यामध्ये १२ महिला (२४ टक्के) आहेत, एकमताने निवडण्यात आली. त्यातून १५ सदस्यांचे राज्य सचिवमंडळ एकमताने निवडण्यात आले, ज्यामध्ये २ महिलांचा (१३ टक्के) समावेश आहे. नवनिर्वाचित राज्य समितीने ४७ वर्षीय डॉ. अजित नवले यांची नवे राज्य सचिव म्हणून एकमताने निवड केली. डॉ. उदय नारकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे नम्रपणे या पदावर पुन्हा निवडून येण्यास नकार दिला.

मदुराई येथील २४व्या सीपीआय(एम) पक्ष काँग्रेससाठी ३ महिलांसह १७ प्रतिनिधी (१८ टक्के), १ महिला प्रतिनिधीसह ३ पर्यायी प्रतिनिधी (३३ टक्के), आणि २ प्रेक्षकांची निवड एकमताने करण्यात आली.

तीन सदस्यीय राज्य नियंत्रण आयोग, ज्याने लगेच महिला प्रतिनिधी प्रा. मधु परांजपे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली, त्याचीही निवड झाली.

मावळते राज्य सचिव डॉ. उदय नारकर आणि उगवते राज्य सचिव डॉ. अजित नवले यांच्या संक्षिप्त भाषणानंतर, अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात, पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी गेल्या काही वर्षातील अत्यंत कठीण परिस्थितीत क्रांतिकार्य करणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे त्यांच्या ऐक्य आणि समर्पणाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी धर्मनिरपेक्ष एकजूट राखण्याचे व बळकट करण्याचे तसेच येत्या काळात संघर्षरत राहून संघटनेच्या मजबूत उभारणीसोबत आपली स्वतंत्र ताकद वाढविण्याचे बुलंद आवाहन केले.

हे राज्य अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अविरत कष्ट घेणाऱ्या सीपीआय(एम) परभणी जिल्हा कमिटीचा आणि सर्व स्वयंसेवकांचा हार्दिक सत्कार करण्यात आला. कम्युनिस्ट इंटरनॅशनल गाऊन मोठ्या उत्साहात अधिवेशनाचा समारोप झाला.

या अधिवेशनात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पक्ष आणि पुरोगामी साहित्य विकले गेले.

Exit mobile version