प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधन, इनोव्हेशनला चालना देणार! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

स्वस्तातील आयुष औषधी केंद्राचे जाळे देशभरात उभारणार

पुणे: “आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचारपद्धती आहे. आयुर्वेदाला जगभर सर्वमान्यता मिळू लागली आहे. प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह इनोव्हेशन व स्टार्टअप सुरु करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना देणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. सर्वगुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार असल्याचेही प्रतापराव जाधव यांनी नमूद केले.

डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ संचालित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे, यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचे (आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन) उद्घाटन प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. स्मिता जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमेरिकास्थित शास्त्रज्ञ डॉ. टोनी नाडर, आयुष मंत्रालयाचे सल्लागार सचिव वैद्य मनोज नेसरी, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे चेअरमन वैद्य जयंत देवपुजारी, ‘आयुष’चे नॅशनल रिसर्च प्रोफेसर डॉ. भूषण पटवर्धन, ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेसचे चेअरमन वैद्य देवेंद्र त्रिगुणा, इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशनचे डॉ. गिरीश मोमया, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेदाचे प्रा. डॉ. सुभाष रानडे, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला आदी उपस्थित होते.

संमेलनामध्ये जागतिक स्तरावर आयुर्वेद प्रसारासाठी डॉ. गुणवंत येवला आणि डॉ. वॉल्टर मोईल्क यांना ‘आयुर्वेद धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आयुर्वेदातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. संजीव गोयल, डॉ. अखिलेश वर्मा, डॉ. एस. एन. पांडे, डॉ. रामदास आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या मान्यतेने झालेल्या या दोन दिवसीय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील संशोधन संचालक प्रा. डॉ. अस्मिता वेले, कायाचिकित्सा विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. जी. दीपांकर, रचना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. योगेश कुट्टे यांनी परिश्रम घेतले. दहा देशातील १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि १२०० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक, वैद्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. ५०० हुन शोधनिबंध सादर झाले.

प्रतापराव जाधव म्हणाले, “योग व आयुर्वेद ही भारताची ओळख आहे. शंभराहून अधिक देशांत आज आयुर्वेद पोहोचला आहे, तर १८० देशांत योगदिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आयुर्वेदीय औषधांना, उपचारांना प्रभावी करण्यासाठी व मान्यता मिळण्यासाठी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळेच संशोधनावर भर दिला जात आहे. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयांसारख्या संस्थांमध्ये संशोधन व विकास केंद्राची उभारणी करण्याचा विचार सुरु आहे. अनेक औषधांना आयएसओ मानांकन दिले जात आहे. देशातही घराघरात आयुर्वेद जाण्यासाठी ‘देश का प्रकृती परीक्षण’ उपक्रम आणला असून, त्यामध्ये सव्वाकोटी लोकांची माहिती संकलित केली आहे.”

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन पुण्यात आणि तेही आमच्या संस्थेत होतेय, याचा आनंद आहे. जगभरातील आयुर्वेदतज्ज्ञ, विद्यार्थी इथे आल्याने विचारांचे आदानप्रदान होत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये आयुर्वेदाचा समावेश ही चांगली बाब आहे. वैदिक संस्कृती, आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाऊल स्वागतार्ह आहे. आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद याची सांगड घालून संशोधनाधारित उपचारांची उपलब्धता समाजासाठी उपयुक्त ठरेल. आयुर्वेदाला प्रभावी, रास्त आणि सहज उपलब्ध करण्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घेतला पाहिजे.”

प्रास्ताविकात डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, “या संमेलनाच्या माध्यमातून आयुर्वेदातील संशोधन, नाविन्यपूर्ण संशोधन, भविष्यकाळात आयुर्वेदाची व्याप्ती, गरजा, उपाय योजना आणि अनेक विकार आणि चिकित्सा या विषयावर विचारमंथन झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रयोग याविषयी जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. अशा संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढून इनोव्हेशन, स्टार्टअप्स संस्कृतीला चालना मिळते.”

वैद्य मनोज नेसरी म्हणाले, “महर्षी आयुर्वेद ही जागतिक स्तरावरील मोठी सामाजिक संस्था आहे. आयुर्वेद उत्पादनांची निर्यात वाढत असून, या क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. आयुर्वेद जगभर पोहोचत आहे. संशोधन होत आहे. त्यामुळे आयुर्वेदाची विश्वासार्हता व प्रभावीपणा दिवसेंदिवस वाढत आहे.” डॉ. टोनी नेडर, वैद्य देवेंद्र त्रिगुणा, डॉ. सुभाष रानडे, डॉ. गिरीश मोमया, डॉ. जयंत देवपुजारी यांनीही मनोगते व्यक्त केली. डॉ. लोथर पियार्क व डॉ. योगेश कुट्टे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गुणवंत येवला यांनी आभार मानले.

Exit mobile version