पुणे महानगर प्रदेशाच्या विकास आराखड्यात रुग्णालये, उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधांची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पीएमआरडीएच्या नियोजनात या बाबींचा अंतर्भाव करण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले.

मुंबई : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत होणाऱ्या विकास आराखड्यात नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये रुग्णालये, उद्याने आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश करावा, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला.

या बैठकीला उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ आणि पीएमआरडीएचे आयुक्त श्री. योगेश म्हसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पीएमआरडीएच्या आराखड्याबाबत झालेल्या या चर्चेत आयुक्त श्री. म्हसे यांनी पुणे महानगर प्रदेशातील प्रस्तावित विकासकामांवर सादरीकरण केले.

पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

बैठकीत पुण्याच्या विस्तारित महानगर प्रदेशातील नव्याने विकसित होणाऱ्या भागांत नियोजन करताना आवश्यक मूलभूत सुविधांचा विचार होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “महानगर प्रदेशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य आणि पर्यावरणीय गरजा लक्षात घेऊन रुग्णालये आणि उद्याने यासारख्या सुविधा आराखड्यात समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. यामुळे नागरिकांना आरोग्य आणि जीवनशैलीसाठी आवश्यक सोयी मिळतील.”

मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक दखल

मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. पीएमआरडीएच्या नियोजनात या बाबींचा अंतर्भाव करण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले.

या बैठकीत पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थापन, नागरी सुविधा आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. भविष्यातील प्रकल्प आणि नियोजन यावरही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

Exit mobile version