फस्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप 2024-25 मध्ये ‘मॅड इंजिनियर्स’ संघ ठरला  ‘इन्स्पायर अवॉर्ड’ विजेता

भारतातील सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा अर्थात विश्‍वकर्मा विद्यापीठ फस्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप

पुणे : शालेय आणि ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांसाठीची भारतातील सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा अर्थात विश्‍वकर्मा विद्यापीठ फस्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धा (FIRST Tech Challenge India Championship 2024-25) नुकतीच  श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत ‘मॅड इंजिनियर्स’ हा संघ ‘इन्स्पायर अवॉर्ड’चा  विजेता ठरला. तसेच रोबोट गेम विजेता अलीन्स कॅप्टन आणि पार्टनर: टीम मॅट्रिक्स आणि टीम युरेका हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते संघ ठरले आहेत.  हे तीनही संघ येत्या १५ ते १९ एप्रिल २०२५ दरम्यान ह्यूस्टन, अमेरिका मध्ये  होणाऱ्या ‘फस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

फस्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप 2024-25 या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यावेळी डॉ. सिद्धार्थ जाबडे (कुलगुरू, विश्‍वकर्मा विद्यापीठ), पद्मश्री प्रमोद काळे (माजी संचालक, ISRO), विश्वनाथ सास्सी आणि प्रगती चौहान (सर्काना), अमित सावरकर  (RTX), विकास साव्हनी (बजाज ऑटो लि.), महेश मसूरकर (संचालक, जॉन डिअर), सजीत चाकिंगल (TMF) आदी उपस्थित होते. विश्‍वकर्मा विद्यापीठ फस्ट टेक  चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप 2024-25 या स्पर्धेत संपूर्ण भारतातून पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या ६० संघांचा सहभाग होता. तसेच कझाकस्तान, श्रीलंका आणि यूएई येथून ६ आंतरराष्ट्रीय संघ देखील सहभागी झाले होते. स्पर्धे दरम्यान पुणे महानगरपालिका (PMC) च्या विद्यायनिकेतन शाळेच्या १५०० विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील स्पर्धेचा अनुभव घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना लाइव्ह रोबोटिक्स मॅचेस पाहण्याची अनोखी संधी मिळाली, ज्यात त्यांनी देशभरातील टॉप संघांशी स्पर्धा करताना उच्च-ऊर्जा, रणनीतीवर आधारित खेळ पाहिले. 

FIRST Tech Challenge विषयी
FIRST Tech Challenge हा एक जागतिक मान्यताप्राप्त, थीम आधारित रोबोटिक्स स्पर्धा आहे, ज्याचे आयोजन FIRST (For Inspiration and Recognition of Science and Technology), यूएसए करते. १९८९ मध्ये डीन कॅमेन आणि वुडि फ्लॉवर्स यांनी FIRST ची स्थापना केली. FIRST चे उद्दीष्ट आहे तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्राशी जोडणे आणि त्यांना नवकल्पनांना उत्तेजन देणे.

Exit mobile version