स्पर्धेत एकूण १५०० खेळाडूंचा उत्स्फुर्त सहभाग; अक्षित कोटनाला, निलेश जुनावणे, लखन शिंदे ठरले भाग्यवान विजेते !!
पुणे: रोटरी क्लब ऑफ पुणे तर्फे आयोजित चालणे, पळणे आणि सायकल चालवणे अशा तीन वेगवेगळ्या गोष्टींचा संगम असलेल्या ‘द अल्टिमेट मूव्ह-ए-थॉन’ स्पर्धेत एकूण १५०० खेळाडूंनी भाग घेतला. पुण्याचे अक्षित कोटनाला, निलेश जुनावणे, लखन शिंदे हे स्पर्धेचे भाग्यवान विजेते ठरले.
शिवाजीनगर येथील बीएमसीसी महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ‘द अल्टिमेट मूव्ह-ए-थॉन’चे अध्यक्ष जयदीप पारेख, रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष मेजर जनरल अमर क्रीष्णा, पबमॅटीक इंडिया प्रा.लि. चे सहसंस्थापक आणि अध्यक्ष मुकूल कुमार, आदित्य बिर्ला म्युच्यूअल फंडचे विभागीय मुख्य मनिष शुक्ला यां च्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘फ्लॅग ऑफ’ करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेतील सायक्लोथॉन आणि मॅरेथॉन ही १० कि.मी. आणि २१ कि.मी. अशा दोन गटात तर, वॉकेथॉन ही ३ कि.मी. आणि ५ कि.मी. अशा दोन गटात स्पर्धा झाली. स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, प्रशस्तीपत्रक, मेडल्स् आणि फुड-पॅकेट देण्यात आले. याशिवाय स्पर्धेत ‘लकी ड्रॉ’ व्दारे भाग्यवान विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलाजी महाविद्यालयाच्या अक्षित कोटनाला, निलेश जुनावणे आणि कोटक महिंद्रच्या लखन शिंदे या तीन भाग्यवान विजेत्यांना गियरची सायकल देण्यात आली. याशिवाय सायक्लोथॉन, मॅरेथॉन आणि वॉकेथॉन या तीनही गटातील भाग्यवान स्पर्धकांना वायलेस चार्जर, बॅकपॅक बॅग, पिकल बॉल किट, बॅडमिंटन किट, क्रिकेट किट अशी विशेष पारितोषिके देण्यात आली.
या अनोख्या स्पर्धेव्दारे रोटरी क्लब ऑफ पुणे तर्फे समाजातील वंचित घटकांच्या फायद्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून (सीएसआर) आणि प्रायोजकत्व, देणग्याव्दारे ग्रामीण क्षेत्रातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांसाठी वैद्यकिय आणि शैक्षणिक गोष्टींसाठी निधी संकलित करण्याचे उद्दीष्ट ठरविले होते. स्पर्धेला देण्यात आलेल्या भरघोस प्रतिसादामुळे निधी संकलित झाल्याचे अध्यक्ष जयदीप पारेख यांनी सांगितले. स्पर्धेला पबमॅटिक इंडिया प्रा.लि., आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड, वेंकीज (इंडिया) प्रा.लि., सी.टी.पंडोल अँड सन्स, रूबी हॉल क्लिनिक, कोटक म्युच्युअल फंड, कुमार कॉर्प आणि स्कार्टर्स अशा विविध क्षेत्रातील कंपन्या, हॉस्पिटल्स् आणि संस्था यांनी पाठींबा दिला होता. त्यांच्या पाठींब्यातून हा निधी संकलित होऊ शकला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा निधी मुलांसाठी लागणारी विविध वैद्यकीय उपकरणे पुरवणे, किशोर मधुमेहींची काळजी, अंगभंग झालेल्यांना कृत्रिम अवयव प्रदान करणे, यासारखी कामे करण्यासाठी तसेच तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी कामांसाठी वापरण्यात येणार आहे. ग्रामीण शाळांमधील गरजेनुसार विविध शैक्षणिक साहीत्य पुरविण्यापासून विद्यार्थ्यांच्या मुलभूत गरजांसाठी आणि आर्थिक सहाय्यतेपासून ते विद्यार्थिनींसाठी शौचालय ब्लॉक तयार करणे यासारखी विविधांगी कामे पूर्ण करण्यासाठी हा निधी उपयोगास येईल, असे जयदीप पारेख यांनी स्पष्ट केले.