इस्त्राईल येथील रोजगाराच्या संधींबाबत ३१ जानेवारीरोजी शिबाराचे आयोजन

इस्त्राईल येथील रोजगाराच्या संधींबाबत ३१ जानेवारीरोजी शिबाराचे आयोजन

पुणे: वैद्यकीय क्षेत्रातील अर्हताप्राप्त उमेदवारांना इस्राईल देशात ‘घरगुती सहायक’ या पदाकरीता रोजगाराची संधी उपलब्ध असून याबाबत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली आहे.

या शिबीरात उमेदवारांना इस्राईल येथील आरोग्य क्षेत्रातील संधीबाबत तपशीलवार माहिती देण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या अर्जाबाबत माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधींचा लाभ घेण्याकरीता शिबारात सहभागी व्हावे.

या रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याकरीता २५ ते ४५ वयोगटातील उमेदवाराकडे इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असावे. यासोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण,पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे मान्यता प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए,एएनएम,जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे किमान ३ वर्षे वैध असणारा पासपोर्ट असणे अनिवार्य आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा किंवा तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्राईलमध्ये सध्या काम करत असू नयेत किंवा इस्राईल देशाचे रहिवासी नसावेत.

अधिक माहितीकरीता https://maharashtrainternational.com या या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हयातील वैद्यकीय महाविदयालये, नर्सिंग महाविद्यालये व संबंधित संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहचवावी तसेच या शिबीरास उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन  मोहिते यांनी केले आहे.

Exit mobile version