मुंबईमध्ये दादर ते चेंबुरपर्यत भव्य शोभायात्रा;प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि नवाब मलिक राहणार उपस्थित…
१९ फेब्रुवारीला अजितदादा पवार किल्ले शिवनेरीवर तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे किल्ले पद्मदुर्गवर आणि अदितीताई तटकरे रायगडावर…
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने ‘स्वराज्य सप्ताहा’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे’ ही टॅगलाईन वापरत दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती, संत गाडगेबाबा जयंती, मराठी भाषा दिन अशा महत्त्वाच्या तिथींचा सुयोग्य संगम साधून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्यावतीने ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा करणे व महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी आपला पक्ष जोडलेला आहे, हे जनतेसमोर मांडणे यासाठी पक्षाकडून आठवडाभर शिवराय केंद्रीत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवरायांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेतून शासन चालवण्याची प्रेरणा घेतो हा उद्देश लोकांसमोर ठेवण्यात येणार आहे.
दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाकडून ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. यामध्ये दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजी पार्क दादर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबुर दरम्यान भव्य शिव शोभायात्रा व बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची सुरुवात सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. तर सांगता चेंबुर येथे आमदार सना मलिक स्वागत करुन पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक उपस्थित राहणार आहेत.
सेल्फी वुईथ किल्ला हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराजांच्या प्रमुख किल्ल्यांचे सेल्फी पॉईंट सर्व चौकात लावण्यात येणार आहेत. शिवाय शिवरायांचे राज्य बहुजनांचे राज्य रयतेचे राज्य या संकल्पनेवर आधारित शिवव्याख्यात्यांचे व्याख्यान ठेवण्यात येणार आहे. तसेच शिवरायांच्या स्वराज्याशी संबंधित चित्र प्रदर्शन, पुस्तकांचे प्रदर्शन, शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यामार्फत घेण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांची माहिती व पत्रक फलकाद्वारे लोकांपर्यंत पोचवली जाणार आहेत. तसेच सर्व ठिकाणी स्कॅनद्वारे येणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मिडिया अभियानाशी जोडण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने ‘राजमाता जिजाऊंचा शिवबा’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. यामध्ये रांगोळी, ऐतिहासिक गाणी, पोवाडे आणि प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंची प्रतिमा लावली जाणार आहे. युवक, युवती व विद्यार्थी व गडकिल्ले संवर्धन विभागाच्यावतीने किल्ले, गडकोट व दुर्ग स्वच्छता मोहीम घेतली जाणार आहे. यावेळी अभिवादन आणि स्वच्छता मोहीमेत १९ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवाजी पार्क येथे खासदार प्रफुल पटेल व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री नवाब मलिक, किल्ले पद्मदुर्ग येथे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, किल्ले रायगडावर बालविकासमंत्री अदितीताई तटकरे उपस्थित राहणार आहेत.
तर दिनांक १९ ते २७ फेब्रुवारी या सप्ताहात किल्ले पन्हाळगड येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, किल्ले हरिश्चंद्र गड येथे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, किल्ले सिंहगड येथे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, किल्ले साल्हेर येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, किल्ले पुरंदर येथे क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे, किल्ले प्रतापगड येथे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, किल्ले नळदुर्ग सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, किल्ले देवगिरी येथे पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थी संघटनेच्यावतीने ‘रयतेचे राज्य शिवरायांचे’ या विषयावर वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा तर अल्पसंख्याक सेलच्यावतीने ‘सबका राजा, शिवाजी राजा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली स्वराज्य सप्ताहानिमित्ताने राज्यभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे उपस्थित होते.