क्लीन सिटी इंदौरच्या अभ्यास दौऱ्यासाठी १०० सफाई कर्मचाऱ्यांसह दोनशे कार्यकर्ते रवाना

पुणे : आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानास पोलीस विभागाच्या माध्यमातून देखील संपूर्ण सहकार्य आगामी काळामध्ये राहणार आहे. पोलीस स्टेशन परिसराच्या स्वच्छते सोबतच कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली वाहन अस्ताव्यस्त पडणार नाहीत, रस्त्यावरील वाहनांची पार्किंग व्यवस्थितपणे व्हायला हवी, याची देखील आम्ही काळजी घेऊ, एक लोकप्रतिनिधी आपला मतदारसंघात चांगला उपक्रम राबवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जात असल्याचे कौतुक असल्याची भावना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. क्लीन सिटी इंदौरला निघालेल्या अभ्यास दौऱ्याच्या प्रस्थानपूर्व कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना अंतर्गत तीन दिवसीय क्लीन सिटी इंदौरचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याचा प्रस्थानपूर्व समारंभ पुणे महापालिकेत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार हेमंत रासने यांच्यासह महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, प्रसिद्ध उद्योजक श्री. सुधीर मेहता, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष श्री. मिलिंद काळे, अतिरिक्त आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी, शहर अभियंता श्री. प्रशांत वाघमारे, घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम, भाजपा कसबा अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह पलिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, कसबा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघाला भारतातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि विकसित मतदारसंघ करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्य केले जात आहे. आज सर्वांसोबत क्लीन सिटी इंदौरच्या अभ्यास दौऱ्यासाठी निघालो असून तेथील स्वच्छतेच्या बाबतीत करण्यात आलेल्या उपाययोजना आगामी काळामध्ये आपल्याकडे राबवण्याचा येतील. यंदा इंदौरला जात असलो तरी पुढील वर्षी लोक स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा बघायला येतील हा आमचा संकल्प आहे”.


Exit mobile version